Tuesday, September 29, 2009

ऐल तीरावर मी अन् पैल तीरावर तू......

भीगा भीगा सा लग रहा है आलम मुझे ... भीनी भीनी सी लग रही है ये सुबह ... भीगा भीगा सा लग रहा है सारा जहाँ मुझे ..... आणि एकदम लक्षात आलं की आपलं आन्थरुण ओलं झालयं. शी ...इतक्यात तीसरे वेळी झालाय हें असं. पहाटेचे साडे पाच वाजले होते ...कळालचं नाही असं कसं झालं ते..

तेवढ्यात मेघा उठलेली दिसली . मेघा माझी धाकटी सुन ... प्रथमेश ची बायको . मला एकदम अपराध्या सारखं वाटू लागलं. काय वाटेल तिला ? शी ...काय करून ठेवले मी हे ....

उठलात का बाबा ?
चहा ठेवतेय मी ... तुमचा पण ठेवते बरं का...
चूळ भरून घ्या ...की तोंड धुवुनच घेता ?

मला उठावसचं वाटेना ... एका हाकेत ओ देणारा मी ... काही बोलत नाही असे बघून ती माझ्या खोलीत आली . आणि तिला एकदम वास आला . मला जाणवलं ते ... पण चेहेरयावर काही दिसू ना देता शांतपणे ती म्हणाली ...
अरे काय झालय बाबा ? ... अंथरुण ओलं झालयं वाटते ..
अं अं ..हो हो .. काही कळालच नाही गं .. मी चाचरत बोललो ...

अरे त्यात काय झालं असं ..ठीक आहे ना ..असू द्यात ... तुम्ही उठा चेंज करून घ्या ... आणि बाथ रूम मधे गिझर मधून उन पाणी काढून देते ..हात पाय पण धुवून घ्या .

मला खुपच लाजल्या सारखं झालं . कान कोंड्या सारखा उठलो. अन् मुकाट पणे न्हाणी घरात गेलो हात पाय धुतलेत, कपडे बदलले , उन उन पाण्याने हात धुवून चूळ भरली आणि परत माझ्या खोली कड़े आलो ....
बघतो तो काय मेघान बिछाना नीट नेटका करून ठेवला होता त्यावर शुभ्र पांढरी चादर आंथरून ठेवलेली. रूम फ्रेशनर स्प्रे शिम्पडून ठेवला ..केवडयाचा सुगंध दरवळत होता.

आणि जणू काही घडलचं नाही ह्या आविर्भावात , मला आवडणारी मारी बिस्किट आणि कमी साखरेचा चहा घेवून ती आत येत होती . मला अजुनही अपराध्या सारखं च वाटत होतं वर बघवेच ना . मी मान खली घालून चहा घेऊ लागलो .

किती त्रास देतो ना मी सग्ळ्यान्ना. मी पुटपुटलो ..
अरे कसला त्रास बाबा ? तुम्ही काय मुद्दाम करताय हे सारं?
मला अजुनच अवघडल्यासारखं झालं .

बाबा होतं असं एखाद्या वेळी . आणि मी काय परकी आहे का आता ? अस उगाच विचार नाही करायचा . थांबा मी ह्यांना सांगतेच आज ... उद्याची रजाच घ्यायला लावते ...

रजा कशाला गं ? तो किती बिझी असतो ..त्याला का त्रास ..मी करेन कंट्रोल.

तसं नाही बाबा . आपण जावू या की डॉक्टर चावला कड़े . तुमचे चेक अप करायचं आहेच ना.
नको गं कशाला.... माझ्या म्हातारयाचा तुम्हाला किती हा त्रास ..
आता मात्र मी रागावेंन हा बाबा .. कसला त्रास घेउन बसलाहात . तुमचा त्रास नाही किती आधार आहे आम्हाला ..

मी विचार करू लागलो ... कसला आधार अन् कसलं काय? माझा आधार की भार ... मी बघतोय हल्ली मजह प्रचंड त्रासच आहे ह्या सग्ळ्यान्ना. पण कधीच दिसत मात्र नाही त्यांच्या चेहेरयावर. माझ्या मधुमेहाचा अन् दम्याचा त्रास पण वाढलाय . माझे म्हातारपणाचे हें साथीदार , जरा जास्तीच सलगी वाढलिये. मी प्रयत्न करतो पत्थ्य पाळायचा पण होतेच कधीतरी इच्छा ... आणि मग सुरु होतो असा त्रास . काय करणार ? आलिया भोगासी..

गेल्याच वर्षी ही गेली . ५५ वर्षांच्या सहवासानंतर... गेलं वर्षभर बेड रिडनच होती . रक्ताचा कर्क रोग . आता हा कही सामान्यांचा आजर नाही . खुप केलं मुलांनी . मेघा तर फार फार सेवा करायची . कीमो थेरपी नन्तरतिला खुप त्रास व्हायचा . चिड चिड वाढायाची. पण सख्या मुलीने नसती जपली इतकं जपलं सुनान्नी. किती त्रास झाला तरी दिसला नाही त्यांच्या चेहेरयावर.

ती सुटली एकदाची. ... मेघाला खुप जाणवलं. बरेच दिवस डिस्टरबड़ होती . तिच्या त्या तश्या असण्याची मला पण एक सवय झाली होती . खुप एकटं एकटं वाटायला लागलं होतं मग. आता तर ती नाही. काय करावं काही सुचत नाही. घरात सगळे जण खुप काळजी घेतात. पण तिच्या नसण्याची भरपाई कशी होवू शकेल ना?

कुण्या कविच्या ओळी आठवतात ...

संध्या छाया भिवविती हृदया
आयुष्याच्या संध्याकाळी
ऐल तीरावर मी अन्
पैल तीरावर तू ..सखे गं ...

अन् टचकन डोळे भरून येतात... पण माणुस आहे ना मग रडायचं पण नसते म्हणे...

मुलांना ही त्यांचे संसार आहेत . नातवंडानाही त्याच्या शाळा कोलेजेस आहेत . सगळे जण जिवापाड जपतात मला . वेळात वेळ काढून माझ्याजवळ येउन बसतात . मला त्यांच्या गमती जमती सांगतात . गप्पा करतात. माझं मन रमवायचा प्रयत्न करतात .

कधी कधी माझाच माझ्यावर ताबा रहात नाही . उगाच चिड चिड करतो मी मुलांवर.तू होतीस तेव्हा समजावयाचिस. गप्प करायचिस. पण आता लक्षातच रहात नाही. समजुन घेतात मला सगळे. उलट उत्तरं नाही देत. पण मग मलाच कसं कसं होउन जाते . दुपारी निवांत बसलो की वाटते एकेकाचे पाय धरून माफ़ी मागावी... पण नाही होत माझ्याकडून ...अंहकार आड़ येतो ना मोठे पणाचा....

दुपारी एकटाच असतो टी वि बघत . कधी गाणी ऐकत. तुझी एक एक गोष्ट आठवत. मी संगीताचा शौकीन तर तू औरंगझेब .... परवाच परवीन सुलतानाचा शामकंस लागला होता . तू असताना कधी ऐकुच नाहीस दिला निवांत. पटकन उठायाचिस अणि टेप बंद करायचिस. आणि मग तासन तास गप्प मारायाचिस. गाण रंगात आलं ..आणि मी एकदम उठालो आणि टेप बंद केला ... इच्छाच नाही उराली बघ आता ....

परवाच शेजारचे देशपांडे आले होते. दुपारचे बसायाला. लोकमत मधला लेख वाचायचा होता त्यांना बसले होते जरा वेळ . मेघान चहा करून आणला. आणि मग पडली जरा जावून निवांत . देशपांडे माझ्याच बरोबरीचे . परिस्थिति पण सारखीच माझ्यापेक्षा जरा सरसच ... बायको होती ना सुख दुखः शेयर करायला ... पण त्यांची वेगळीच रड कथा होती सुरु.

तुमचं बरय बुवा . सुन आणि मुलगा किती काळजी घेतात तुमची. आमच्या कड़े तर नाव नका घेऊ .. काय छळ मांडला आहे हो ... सुन बाई चुगल्या करते आणि हा ठोम्ब्या चक्क आमच्यावर चोरीचा आरोप करतो हो.. मी नको आहे त्यांना ...त्यांना हवा आहे माझा पैसा . मजबूरी आहे हे म्हातारपण ...

मला कससचं वाटलं...

त्या पलिकडे राहणार्या गोडसे वाहिनी ... त्यांची तर कथाच निराळी. त्यांचा येवडा मोठा बंगला. त्यात रहातय कोण तर त्या आणि त्यांचा टॉमी.. त्यांचा मुलगा आणि सुन अमेरिकेत असतात. ग्रीन कार्ड मिळालय त्यांना . आणि आई इथे टॉमी बरोबर काढतेय दिवस..
बँकेत भेटल्या होत्या मागे ...

म्हणत होत्या रेगुलर पैसे पाठवतो हो चिन्मय आमचा मला ... पण मी काय करू हो त्याचं? मला मेलिला लागतेच असं काय? त्याला ये ये म्हणते तर सांगतो की खुप खुप बिझी आहे म्हणून .... आणि सुन बाई ला तर म्हणे इंडिया आवडतच नाही ..

फोन वर ऐकते कधी मधि त्याचा आवाज ...म्हणतो अजुन हवे आहेत का पैसे .... कसं सांगू हो त्यांना ....मला माणसं हवीत हो ... माणसं .... पैश्यांनि मिळतात का हो माणसं? कधी कळतिल हो त्यांना माझ्या म्हातारीच्या व्यथा?
आणि त्या पदराने डोळे टिपू लागल्यात

जेव्हा एकटा असतो तेव्हा टी वि बघता बघता कळकळुन तुझी आठवण येते . आतून रडू येतं. अतिशय कष्टाने डोळ्यातले पानी परतवून लावतो. होतीस तेव्हा खुप बोललो तुला ना... तुला अग्नी देताना बघून मीच जळत होतो आतून ... बस आता त्या आठावणीच उरल्या आहेत आता . त्यांच्याच आधाराने जगतोय . जगतोय हे उरलेलं आयुष्य ... नकोसं असलेलं पण न संपणार आयुष्य .... माझं म्हातारपण ...सुखी म्हातारपण ... मला नकोसं असलेलं ..माझं सुखी म्हातारपण

सुनील जोशी
२७/०९/२००९

No comments: