Tuesday, September 29, 2009

ऐल तीरावर मी अन् पैल तीरावर तू......

भीगा भीगा सा लग रहा है आलम मुझे ... भीनी भीनी सी लग रही है ये सुबह ... भीगा भीगा सा लग रहा है सारा जहाँ मुझे ..... आणि एकदम लक्षात आलं की आपलं आन्थरुण ओलं झालयं. शी ...इतक्यात तीसरे वेळी झालाय हें असं. पहाटेचे साडे पाच वाजले होते ...कळालचं नाही असं कसं झालं ते..

तेवढ्यात मेघा उठलेली दिसली . मेघा माझी धाकटी सुन ... प्रथमेश ची बायको . मला एकदम अपराध्या सारखं वाटू लागलं. काय वाटेल तिला ? शी ...काय करून ठेवले मी हे ....

उठलात का बाबा ?
चहा ठेवतेय मी ... तुमचा पण ठेवते बरं का...
चूळ भरून घ्या ...की तोंड धुवुनच घेता ?

मला उठावसचं वाटेना ... एका हाकेत ओ देणारा मी ... काही बोलत नाही असे बघून ती माझ्या खोलीत आली . आणि तिला एकदम वास आला . मला जाणवलं ते ... पण चेहेरयावर काही दिसू ना देता शांतपणे ती म्हणाली ...
अरे काय झालय बाबा ? ... अंथरुण ओलं झालयं वाटते ..
अं अं ..हो हो .. काही कळालच नाही गं .. मी चाचरत बोललो ...

अरे त्यात काय झालं असं ..ठीक आहे ना ..असू द्यात ... तुम्ही उठा चेंज करून घ्या ... आणि बाथ रूम मधे गिझर मधून उन पाणी काढून देते ..हात पाय पण धुवून घ्या .

मला खुपच लाजल्या सारखं झालं . कान कोंड्या सारखा उठलो. अन् मुकाट पणे न्हाणी घरात गेलो हात पाय धुतलेत, कपडे बदलले , उन उन पाण्याने हात धुवून चूळ भरली आणि परत माझ्या खोली कड़े आलो ....
बघतो तो काय मेघान बिछाना नीट नेटका करून ठेवला होता त्यावर शुभ्र पांढरी चादर आंथरून ठेवलेली. रूम फ्रेशनर स्प्रे शिम्पडून ठेवला ..केवडयाचा सुगंध दरवळत होता.

आणि जणू काही घडलचं नाही ह्या आविर्भावात , मला आवडणारी मारी बिस्किट आणि कमी साखरेचा चहा घेवून ती आत येत होती . मला अजुनही अपराध्या सारखं च वाटत होतं वर बघवेच ना . मी मान खली घालून चहा घेऊ लागलो .

किती त्रास देतो ना मी सग्ळ्यान्ना. मी पुटपुटलो ..
अरे कसला त्रास बाबा ? तुम्ही काय मुद्दाम करताय हे सारं?
मला अजुनच अवघडल्यासारखं झालं .

बाबा होतं असं एखाद्या वेळी . आणि मी काय परकी आहे का आता ? अस उगाच विचार नाही करायचा . थांबा मी ह्यांना सांगतेच आज ... उद्याची रजाच घ्यायला लावते ...

रजा कशाला गं ? तो किती बिझी असतो ..त्याला का त्रास ..मी करेन कंट्रोल.

तसं नाही बाबा . आपण जावू या की डॉक्टर चावला कड़े . तुमचे चेक अप करायचं आहेच ना.
नको गं कशाला.... माझ्या म्हातारयाचा तुम्हाला किती हा त्रास ..
आता मात्र मी रागावेंन हा बाबा .. कसला त्रास घेउन बसलाहात . तुमचा त्रास नाही किती आधार आहे आम्हाला ..

मी विचार करू लागलो ... कसला आधार अन् कसलं काय? माझा आधार की भार ... मी बघतोय हल्ली मजह प्रचंड त्रासच आहे ह्या सग्ळ्यान्ना. पण कधीच दिसत मात्र नाही त्यांच्या चेहेरयावर. माझ्या मधुमेहाचा अन् दम्याचा त्रास पण वाढलाय . माझे म्हातारपणाचे हें साथीदार , जरा जास्तीच सलगी वाढलिये. मी प्रयत्न करतो पत्थ्य पाळायचा पण होतेच कधीतरी इच्छा ... आणि मग सुरु होतो असा त्रास . काय करणार ? आलिया भोगासी..

गेल्याच वर्षी ही गेली . ५५ वर्षांच्या सहवासानंतर... गेलं वर्षभर बेड रिडनच होती . रक्ताचा कर्क रोग . आता हा कही सामान्यांचा आजर नाही . खुप केलं मुलांनी . मेघा तर फार फार सेवा करायची . कीमो थेरपी नन्तरतिला खुप त्रास व्हायचा . चिड चिड वाढायाची. पण सख्या मुलीने नसती जपली इतकं जपलं सुनान्नी. किती त्रास झाला तरी दिसला नाही त्यांच्या चेहेरयावर.

ती सुटली एकदाची. ... मेघाला खुप जाणवलं. बरेच दिवस डिस्टरबड़ होती . तिच्या त्या तश्या असण्याची मला पण एक सवय झाली होती . खुप एकटं एकटं वाटायला लागलं होतं मग. आता तर ती नाही. काय करावं काही सुचत नाही. घरात सगळे जण खुप काळजी घेतात. पण तिच्या नसण्याची भरपाई कशी होवू शकेल ना?

कुण्या कविच्या ओळी आठवतात ...

संध्या छाया भिवविती हृदया
आयुष्याच्या संध्याकाळी
ऐल तीरावर मी अन्
पैल तीरावर तू ..सखे गं ...

अन् टचकन डोळे भरून येतात... पण माणुस आहे ना मग रडायचं पण नसते म्हणे...

मुलांना ही त्यांचे संसार आहेत . नातवंडानाही त्याच्या शाळा कोलेजेस आहेत . सगळे जण जिवापाड जपतात मला . वेळात वेळ काढून माझ्याजवळ येउन बसतात . मला त्यांच्या गमती जमती सांगतात . गप्पा करतात. माझं मन रमवायचा प्रयत्न करतात .

कधी कधी माझाच माझ्यावर ताबा रहात नाही . उगाच चिड चिड करतो मी मुलांवर.तू होतीस तेव्हा समजावयाचिस. गप्प करायचिस. पण आता लक्षातच रहात नाही. समजुन घेतात मला सगळे. उलट उत्तरं नाही देत. पण मग मलाच कसं कसं होउन जाते . दुपारी निवांत बसलो की वाटते एकेकाचे पाय धरून माफ़ी मागावी... पण नाही होत माझ्याकडून ...अंहकार आड़ येतो ना मोठे पणाचा....

दुपारी एकटाच असतो टी वि बघत . कधी गाणी ऐकत. तुझी एक एक गोष्ट आठवत. मी संगीताचा शौकीन तर तू औरंगझेब .... परवाच परवीन सुलतानाचा शामकंस लागला होता . तू असताना कधी ऐकुच नाहीस दिला निवांत. पटकन उठायाचिस अणि टेप बंद करायचिस. आणि मग तासन तास गप्प मारायाचिस. गाण रंगात आलं ..आणि मी एकदम उठालो आणि टेप बंद केला ... इच्छाच नाही उराली बघ आता ....

परवाच शेजारचे देशपांडे आले होते. दुपारचे बसायाला. लोकमत मधला लेख वाचायचा होता त्यांना बसले होते जरा वेळ . मेघान चहा करून आणला. आणि मग पडली जरा जावून निवांत . देशपांडे माझ्याच बरोबरीचे . परिस्थिति पण सारखीच माझ्यापेक्षा जरा सरसच ... बायको होती ना सुख दुखः शेयर करायला ... पण त्यांची वेगळीच रड कथा होती सुरु.

तुमचं बरय बुवा . सुन आणि मुलगा किती काळजी घेतात तुमची. आमच्या कड़े तर नाव नका घेऊ .. काय छळ मांडला आहे हो ... सुन बाई चुगल्या करते आणि हा ठोम्ब्या चक्क आमच्यावर चोरीचा आरोप करतो हो.. मी नको आहे त्यांना ...त्यांना हवा आहे माझा पैसा . मजबूरी आहे हे म्हातारपण ...

मला कससचं वाटलं...

त्या पलिकडे राहणार्या गोडसे वाहिनी ... त्यांची तर कथाच निराळी. त्यांचा येवडा मोठा बंगला. त्यात रहातय कोण तर त्या आणि त्यांचा टॉमी.. त्यांचा मुलगा आणि सुन अमेरिकेत असतात. ग्रीन कार्ड मिळालय त्यांना . आणि आई इथे टॉमी बरोबर काढतेय दिवस..
बँकेत भेटल्या होत्या मागे ...

म्हणत होत्या रेगुलर पैसे पाठवतो हो चिन्मय आमचा मला ... पण मी काय करू हो त्याचं? मला मेलिला लागतेच असं काय? त्याला ये ये म्हणते तर सांगतो की खुप खुप बिझी आहे म्हणून .... आणि सुन बाई ला तर म्हणे इंडिया आवडतच नाही ..

फोन वर ऐकते कधी मधि त्याचा आवाज ...म्हणतो अजुन हवे आहेत का पैसे .... कसं सांगू हो त्यांना ....मला माणसं हवीत हो ... माणसं .... पैश्यांनि मिळतात का हो माणसं? कधी कळतिल हो त्यांना माझ्या म्हातारीच्या व्यथा?
आणि त्या पदराने डोळे टिपू लागल्यात

जेव्हा एकटा असतो तेव्हा टी वि बघता बघता कळकळुन तुझी आठवण येते . आतून रडू येतं. अतिशय कष्टाने डोळ्यातले पानी परतवून लावतो. होतीस तेव्हा खुप बोललो तुला ना... तुला अग्नी देताना बघून मीच जळत होतो आतून ... बस आता त्या आठावणीच उरल्या आहेत आता . त्यांच्याच आधाराने जगतोय . जगतोय हे उरलेलं आयुष्य ... नकोसं असलेलं पण न संपणार आयुष्य .... माझं म्हातारपण ...सुखी म्हातारपण ... मला नकोसं असलेलं ..माझं सुखी म्हातारपण

सुनील जोशी
२७/०९/२००९

Sunday, September 27, 2009

संशय का मनी आला ? .....

आज १५ वर्षानी माझी मैत्रीण मला भेटली . भेटली म्हणजे निवांत होती , निवांत आणि ते पण चक्क तिच्या ऑफिस मधे.
गेल्या वर्ष भरात माझी इकडे बदली झाल्या पासून अधून मधून माझं फ़ोन वर बोलण होत होतं . आणि त्या उभयतांची भेट पण एकदा झाली होती बिग बझार ला.

बरं झालं सुनील आज भेट झाली ते .. काल सुटी आणि उद्याचा रविवार म्हणून बरेच जण आजची सी एल काढून गेलेत सुटीवर आणि आज कौण्टर्स पण बघ सगळे रिकामेच आहेत . परवा तुझी लेक आली होती , चेक देऊन गेली , भरलाय तो परवाच , आणि रिसिप्ट पण घेतलेली आहे माझ्याकडे ....

तुझी लेक आता मोठी झाली रे , छान दिसते आणि ती , उंच तर आहेच आणि दिसते पण गोड, आणि बोलते पण मस्त् हा ... बर्या वर्षानी बघितली ना तिला ... एकदम वर्षभराची असताना बघितलेली होती रे तिला

सुप्रिया नेने , माझी शाळेतली वर्गमैत्रीण. अगदी बालवाडी पासुनची. एकच वेटाळात रहायचो आम्ही . सुप्रिया लहानपणी दिसायची गोडच .अगदी जवळच रहायची आमच्या , तिची आई नोकरी ला जायची मग आमच्या कड़े असायची नेहेमी , काकू काकू करत आईच्या भोवती पिंगा घालत. घरी राहण, मस्ती करण, खाण सगळ चालायचं अगदी बिनधास्त.

पाचव्या वर्गात गेल्यानंतर मात्र एकच वर्गात असुनसुद्धा एकमेकांशी बोलणे तर राहिले बाजूला एकमेकांकडे बघायचे पण बंद केले आम्ही . ते दिवस ७० च्या दशकातले... यथावकाश आम्ही दहावी झालो , बारावी झालो ..सुप्रिया कामर्स ला आणि मी इंजीनियरिंग ला गेलो . दिसत असू एकमेकांना पण बोलचाल अशी नव्हती . आम्ही आपल्याच विश्वात दंग होतो . अगदी सोवळे नव्हतो पण मस्ती करायचो सांभालूंनच

ती बँकेत लागली आणि में इकडे Lecturer म्हणुन कॉलेज ला
माझं पहिलं पोस्टिंग आलं लांब तिकडे मराठवाड्यात. आता मी इकडचा विदर्भातला तिकडून इकडे यायचे म्हणजे निदान १२-१४ तासाचा बसचा प्रवास . फार कंटाळा यायचा. बाबु तिकडे एकटा राहतो आणि त्याने काही उद्योग करू नये म्हणून चिंताक्रांत पालकांनी जणू मोहिमच हाती घेतली. माझं चांगभलं करण्याचा जणू चंगच बांधला त्यांनी. आणि सहा महिन्याच्या आताच माझे दोनाचे चार झालेत.

आता मला पण करमत होतं तिकडे. लांब दुरवर आम्ही दोघेच राजा राणी. दिवस भुर्रकन उडून जात होते. आमचा मधुचंद्र सुरु होता अगदी कुठे ही फिरायला ना जाता . आणि त्या दिवशी तिला जरा बरे वाटत नव्हते . मग डॉक्टर कड़े जावून दाखवू या म्हणून संध्या काळची appointment घेतली. आणि मग दोक्टोरान्नी आम्हाला ते गुपित सांगितलं. आम्ही दोघेही खुप खुश होतो त्या दिवशी . शेयर करायला तो आनंद मात्र कोणीच नव्हतं अजुन सोबत . मग फ़ोन करून आई बाबांना अणि सासु सासर्यान्ना ही आनंद वार्ता कळवली .

मग आनंदाने उड्या मारत गावभर ऊंडारलो . व्ह्यायचा तोच परिणाम झाला . अनुभव नसल्यामुळे त्या उड्या अंगाशी आल्यात . आणि काही कळायाच्या आत तिला विचित्र त्रास सुरु झाला .. काही तासांपूर्वी आनंदात असलेले आम्ही एकदम जमिनीवर आलो हवेतून ... तिचं पहिलं Miscarriage झालं.
आता तिकडे मन रमेना. सतत त्याच आठवणी , मी दिवसभर स्वताला कामात गुंतवून घेत होतो पण तिला मात्र घर ख्याला उठायचं. मग परत विदर्भात बदली साठी प्रयत्न सुरु केलेत. आणि यश आलं. नागपुर हुन १००-१२५ की.मी. वर एका गावात बदली झाली . हे गाव शांत होतं निसर्ग रम्य होतं. वेळ ना घालवता मी लगेच इकडे रुजू झालो .

त्याच सुमारास सौ ला परत कड़क डोहाळे सुरु झालेत आता लग्नाला ३ वर्षं झालेली होती . वर्षभरा नंतर पहिलं Miscarriage झालेलं असल्या मुळे ह्या वेळी विशेष काळजी घेण सुरु होतं आणि आता रिस्क नको म्हणून ज्येष्ठाच्या सल्ल्यानुसार पाचव्या महिन्यातच तिची रवानगी माहेरी करण्यात आली . आता तिला त्रास नको दगदग नकोमे-जून महिना साधारण बदल्यांचा, आणि शाळा कोलेजेस ना सुटयांचा . पण संस्था विकासाच्या योजना आणि तत्सम कामा करीता आम्हा काही तरुण प्राध्यापकांना सुटीत कामाला लावण्यात आले. आणि मी पण आनंदाने ते काम स्वीकारले. दिवसभर वेगवेगळे आराखडे तयार करणे चर्चा करणे ही कामे सुरु असत. संध्याकाळी राजुच्या टपरीवर कटिंग चहा घेउन मग आम्ही आपल्या घरी रवाना होत असू.
त्या दिवशी पण असाच चहा घेउन घरी निघालो. माझ्या मोटर सायकल ने मेन रोड वरून आत वळलो . समोरून ३-४ जणी येत होत्या. चार चौघीत पण वेगळी ओळखु येइल अशी ती. मी सहजगत्या गाडीला ब्रेक लावला .
अरे सुप्रिया तू?....... तू इकडे कुठे ?
आणि तिच्या पण डोळ्यात आश्चर्याचे भाव ...
अरे तू कुठे इकडे?..... ती मला विचारत होती .
अगं मी इथेच असतो २ वर्षं झालीत
अरे मी पण इकडे आले आठ च दिवस झालेत बघ ..प्रमोशन वर ...
मला काहीच कल्पना नाही बघ तू पण इथेच आहेस म्हणून ...

शाळा सुटल्यावर आम्हा दोघांची ती आमने सामने पहिलीच भेट ... आणि जवळ पास पहिलच संभाषण २० वर्षानंतर ...
तिच्या मैत्रीणीन्ना ओळख करून द्यायचा कार्येक्रम पार पडला. तू कुठे? कसं काय सुरु आहे ? आई बाबा वगैरे जुजबी चौकश्या पार पडल्यात आणि मग आम्ही आपापल्या मार्गी लागलो म्हणून माझं तिथे नसण एकदम संयुक्तिक होतं . त्यामुले मला इकडेच रहावं लागलं.
मध्यंतरी श्रीराम नेने ..सुप्रियाचे मिस्टर तिला भेटायला आणी तिची व्यवस्था करून द्यायला येउन गेलेत . नेमका त्यावेळी मी काहीतरी कामाने मुंबई ला गेलो होतो. त्या वेळी त्यांची माझी भेट काही झाली नाही .
मग आला ऑक्टोबर महिना ... बाळतपणाची तारीख जवळ येत होती . आणी नेमक्या वेळी , बालंतीण प्रसूति कक्षात असताना , चिंताक्रांत पणे कक्षाबाहेर येरझार्या मारनार्या चांगल्या नवर्याची भूमिका पार पाडण्या साठी मी सासुरवाडीला पोहोचलो मी पोहोचलो ६ तारखेला ... मुलीला कळाले की काय कोण जाणे.... तिने सात तारखेला जन्म घेतला.. मुलींना म्हणतात बापाची काळजी असते .. बापाला जास्ती त्रास नाही होवू देत त्या ...
त्या आनंदात ८-१० दिवस कसे भुर्रकन उडून गेलेत . प्रसूति नंतर सौ आणी मुलगी व्यवस्थीतपणे घरी आल्यात. सगळ्यान्चा जीव भांड्यात पडला . बारसे वगैरे ची तारिख ठरवून मी परत आपल्या गावाला परत आलो .
इकडे परत आलो रूटीन सुरु झाले . मन मात्र तिकडेच होते ... सतत आठवण यायची .. त्या दिवशी कोलेज मधून परत येत होतो .. सुप्रिया दिसली ..एकटीच येत होती पायी पायी. तिला बघितले आणी थांबलो. अन् सहज बोललो चल सोडून देतो तुला . ती पण अगदी सहज पणे मागे बसली... अंतर ठेवूनच ... तिला रूम वर सोडले ..
अरे ये की आत .. आला आहेस तर चहा करते की अर्धा अर्धा कप ... मला पण घ्यायचा आहेच ..तेवढीच कंपनी ... मग मी पण बसलो ..इकड़ तिकडच्या गप्पा करत. मधेच कोणी पुरुषाचा आवाज आला म्हणून शेजारच्या काकू डोकावून गेल्यात
चहा झाला आणी निघणार इतक्यात मिस्टर नेने आलेत .. त्यांची माझी ती पहिलीच भेट ... सुप्रिया ला एकदम आश्चर्य वाटले ..अरे तुम्ही असे अचानक कसे? हां Sunil माझा शालेताला मित्र.. हा सुद्धा इथेच असतो . मी हस्तान्दोलाना साठीहात पुढे केला .. थोडा सा उशिराने त्यांनी हात पुढे केला आणी थंड पणे माझ्या अभिवादनाचा स्वीकार केला .
थोडा वेळ गप्पा मारून मग मी माझ्या घराकडे रवाना झालो
दिवस जात होते .काळ हळु हळु पुढे सरकत होता . मुलगी ३ महिन्यांची झाली ..आता सौ ला पण परतीचे वेध लागलेत दोघिन्ना घेउन मी परत गावी आलो . सुप्रिया ची आणी तिची ओळख करून दिली आणी पहिल्याच भेटित दोघिन्ची मस्त् गट्टी जमली. बरयाच वेळी मला कामाने बाहेर गावी जावे लागे, त्यावेळी सुप्रिया माझ्याकडेच मुक्कामी असायची .... हिला तर तिचा फार आधार वाटायचा
माणसातं राहून माणसं वाचायची एक सवय लागली आहे मला. सुप्रिया ला बघितल्यावर मला जाणवायाचं की ती कसल्या तरी तणावात आहे. कदाचित लहान मुलं घरी असतात त्याची काळजी असावी. बोलत नव्हती कधी . माझ्याशी तर नाहीच ..कधी मधे नवर्याची तकरार असायची सौ जवळ .
दोन वर्ष झालीत . प्रयत्न करून सुप्रियाने स्वताची बदली करून घेतली परत नागपुर ला . पति पत्नी एकत्रीकरणाच्या मुद्द्यावर...
नंतर परत भेटी अश्या फारश्या झाल्याच नाहीत. मी नागपुर ला यायचो पण आपल्याच कामत इतका दंग असायचो की कुठे बाहेर जायला वेळच मिळायाचा नाही. कुठे जायचं असून पण जाणेच व्हायचे नाही .
गेल्या वर्षी माझी बदली नागपुर ला झाली . आता स्वगृही आल्याच्या आनंदात सगळ्या जुन्या मित्रांना बोलावून गेट टू गेदर करायचा घाट घातला . माझ्याच घराच्या गच्चीवर कार्यक्रम ठरवला . विथ फॅमिली जवळ पास १२५-१५० लोक आलेत . धमाल आली . सुप्रियाला पण बोलावलं होतं पण सासुबाइन्च्या प्रकृति मुळे तिचं य़ेण झालं नाही .

मध्यंतरी एक दोन वेळा मी आणि सौ तिच्या कड़े जावून आलोत. तिच्या मिस्टरांशी छान गप्पा केल्यात . तिची मुलही आता बरीच मोठी झाली होती . मोठा Final ला अणि लहाना १२ वी ला होता . आमची श्रेया पण बघता बघता १० वी ला आली होतीच की.

त्या दिवशी श्रेयाला तिच्या बँकेत घेउन गेलो आणी तिची ओळख करून दिली सुप्रियाशी मग आता ती जाता येता बिनधास्त पणे आत्या कड़े जायची आणी तिची आणी आमची पण कामे करून आणायची . परवा पण असच काम होतं . ती चेक देऊन आली आत्या जवळ आणी निघून गेली गर्दी असल्याने . मग मी रिकामाच असल्याने विचार केला चला जावून येवू या ..बरयाच दिवसात भेट नाही झाली भेटून पण येवू या की
बँकेत पोहोचलो तर मैडम निवांत बसलेल्या . एके काळची ब्यूटी क्वीन , पार काळवंडून गेलेली . नकळत माझ्या तोंडून निघालं..
का गं तब्येत नाही का बरी?

तिच्या निस्तेज चेहेर्यावरच्या पाणीदार टपोर्या डोळ्यात पानी तरळल...
ए जरा वेळ आहे का तुला?

तिच्या त्या बोलण्यातलं आर्जव काळीज चिरत गेलं ...

सुप्रिया हे काय मी काही इतका बिझी नाही हं .... बोल ना ... आहे मी निवांत

सुनील आपण लहानपणचे मित्र . मी किती जिद्दी ते तुला चांगलच माहिती आहे . तू मुलगा , मी एक मुलगी ...पण कधी फरक जाणवला का तसा... कामाच्या बाबतीत तरी..

लग्न ...खरं तर मला इंटेरेस्ट च नव्हता बघ त्यात ... पण आई बाबां साठी मी स्वीकारलं हे बंधन ... आज दोघे पण नाहीत ..... इतकं कचकड्याचं असतं का रे हे नातं?

मी त्या पायी माझी करीयर ग्रोथ माझ्या हातान थाम्बवली बघ ...

तुला तर माहितीच आहे की कामाला मी कधीच हारणारी नव्हते ...नाही आज पण ... पण ..पण ..मानसिक छळ नाही रे मी सहन करू शकत ...

संशय संशय ..आणि संशय ... २२ वर्षात येवढच का रे ओळखलं ह्यांनी मला ...

अग अस काही नसते ..तुला उगीच वाटत असते काही तरी ..मी तिला सांतवना साठी बोललो ...
नाही सुनील ...मी उगाच नाही म्हणत हे ...
अरे मी तिकडे होते ना आले प्रमोशन वर त्यावेळी ..त्यांना संशय आला होता ...
कसला संशय गं?
अरे त्यांना संशय होता तुझ्या माझ्या संबंधांचा ....
मी आतून हललो...
आता माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं... शुन्य झालो मी ....
शून्य झालो मी .....



सुनील जोशी
२२/०९/२००९