Monday, November 23, 2009

रुसलेली कविता ....

रुसलेली कविता ....

बारा स्वर अन बत्तीस व्यंजन
त्यातले लाडके माझे र अन ट
कारण अगदी सोप्प अन सरळसोट
अरे लावा र ला र अन ट ला ट
छापून टाका एक कविता सरसकट .

काय झालयं पण आज नाहीच कळत
र अन ट ची जुगलबंदी आज नाहीच जमत
जुगलबंदी नाही जमत अन मैफल नाही रंगत
बेरंग मैफलीत मग जानही नाही येत ......


बेजान मैफिलीतला मी एक मी खांब
रुसलेल्या कवितेची समजूत कशी काढू सांग?
रुसलेल्या कवितेची समजूत कशी काढू सांग?

सुनील जोशी
२०/११/०९

तो कवडसा........

तो कवडसा........

माझ्या मनातली ती एक खिड़की
खिडकितुन येणारा तो कवडसा
कधी उगवतीच्या सुर्याचा
तर कधी पौर्णिमेच्या चंद्राचा

येणारा तो कवडसा
येतो घेउन आठवणी
सुर्याच्या दाहकतेच्या
चंद्राच्या शितलतेच्या

तू असता सोबत
रंगलेल्या त्या गोष्टी
काही अलवारं गुजं
त्याच पौर्णिमेच्या
चंद्राच्या साक्षीने

तू नसताना सोबत
रमायचं अन् जगायचं
की फ़क्त जगायचं
कोण जाणे.....

कलू लागलयं ...हलू हलू ...

साखर झोपेत असतानाच
निघून गेलेली तू
अन् त्या उगवतीच्या कवडश्यान
आली होती मला जाग

आता सवय व्ह्यायला लागली आहे

पण डोकावून जातोच ना
मनाच्या खिडकितुन तो कवडसा
खिडकितुन येणारा तो कवडसा......
कधी उगवतीच्या सुर्याचा
तर कधी पौर्णिमेच्या चंद्राचा

अन् मग कधी मी हरतो
तर कधी हरवून जातो........

सुनील जोशी
१७/११/२००९

वर्ज्य पंचम .....

वर्ज्य पंचम .....

आठवतयं तुला
त्या मैफिलितला
तो मारवा......
सांज समयी रंगलेला

मी व्याकूळ, घनव्याकूळ
तृषार्त जन्मजन्मांतरिचा...
अन् राधा होवुनी तू आलेली
तृप्त करण्या त्या मोहना.....

त्रुप्तिचे मग वरदान लाभता
काय मागीतलेस ?

होते ते वरदान की शाप
अजुन ही न सुटलेले कोडं

मागितलास तू वर्ज्य पंचम
त्या मारव्यातला
वर्ज्य पंचम .....

शोधतोय अन् अजुनही
मी देऊ काय तुला
मी देऊ के तुला???

सुनील जोशी
१७/११/०९

रामा .....

रामा .....
अनुदिनी अनुतापे मनी ही अशांतता
सुटण्या त्यातुनी मी तडफड़ता
शांतवे मम चित्ताची अस्थिरता
रामा तुझे कोमल नाम घेता

सैरभैर मन माझे होता
कळे ना कसे आवरू त्या
वाटे शांत शांत मम चित्ता
रामा तुझे कोमल नाम घेता

तू जगताचा पालक त्राता
सकल दुक्खितांचा दैन्य हर्ता
दैन्य हरी करी सुखाची पुर्तता
रामा तुझे कोमल नाम घेता

सुनील जोशी
१७/११/०९

Tuesday, November 17, 2009

पश्च्याताप....... पण कधी?


१६ मार्च २०५१ ....
पंजाब मधील ते एक जुन्या काळातिल समृद्ध खेडं. नुकताच बैसाखी चा सण आटोपलेला. आजकाल सण येतात अन् जातात. पहिल्या सारखी मजा राहिली नाही. जसप्रीत कौर ला जुने दिवस आठवत होते, अन् त्या आठवाने व्याकुळ होवून शांतपणे उसासे सोडत बसली होती ती. २०१७ साली लग्न होउन ती ह्या घरात आली. कोण समृद्धि होती त्यावेळी . सुख कसं भरभरून वाहत होतं. शेतीत नुसतं सोन पिकत होतं. भारताची सम्पूर्ण भूक भागवणारा प्रान्त म्हणून नाव होतं पंजाबचं. पण गेले ते दिवस. शेती आहे अजुन ही पण आता आधी सारखी रया नाही राहिली . सगलं कसं उदास ..भकास....

यश आणि जगजीत जसप्रीत ची दोन मुलं. त्यांना पदरात घालून त्यांचा बाप १८ वर्षापुर्विच देवाघरी गेला . लहान लहान मुलांना घेउन ह्याच काळ्या मातीत कसून जसप्रीत ने दोघांना लहानाचे मोठे केले. दोघेही भाऊ आता शेती करत होते आणि आपल्या आईला सुख द्यायचा पुरेपुर प्रयत्न करत होते. यश लहान आणि जगजीत मोठा. यश लहान असून पण होता धडधाकट . जगजीत मोठा पण नाजुक चणीचा.

यश जागा होता. वाट बघत होता उर्वशिची . आता येइल मग येइल . थोडा सा अधीर झालेला . पण सध्या उर्वशी, मोठ्या जगजीत सोबत प्रणय क्रीडेत रत होती.

पंचेविस तीस वर्षापूर्वी असला प्रकार .... विचार करण पण पाप होतं. भावाची बायको म्हणजे भाभी .... तिच्याकडे बघण पण पाप होतं. तर तिची वाट बघत बसण. कुणी असा विचार पण नव्हतं कधी करत. विज्ञानाचे चमत्कार घडत होते. ग़र्भजल तपासणी अन् लिंग निदान परीक्षा हे दोन शोध लागलेत. हें शोध काय लागलेत माकडाँच्या हाती कोलितच मिळालं जणू, हें आक्रित घडलं.......
त्या काळी असं काही घडण म्हणजे स्त्री देहाची घोर विटम्बना समजली जायची. पण आता मात्र ती जगण्याची एक अपरिहार्यता झालेली होती. स्त्री पुरुष प्रमाण झालेलं होतं दर हजारी ३०० .....
इतकी विषमता. दूसरा काही पर्यायच उरला नव्हता. जगजीत २ वर्षांनी मोठा . अगदी कठिन परिस्थिति असून सुद्धा बँकेचे कर्ज काढून आणि मोठा हुंडा देऊन त्यांनी उर्वशिला घरी आणलं . तशी उरवशी पण नशिबवानच ... तिला फ़क्त दोनच नवरे साम्भाळावे लागत होते. तिच्या कित्येक मैत्रीणीना तर तिन किंवा चार चार माणसांची शय्या सोबत करावी लागत होती.
विसाव्या शतकातलं एकास एक हें तर केवळ एक स्वप्नच उरलं होतं.

उर्वशिला यायला उशीर होतोय असं बघून यश ची कुरकुर सुरु झाली. तसाही उर्वशिला यश बरोबर जास्ती आवडायचं. कारण ही अगदी उघड होतं ... यश कसा तिला पूर्ण खुश करून टाकायचा. जगजितच्या पण ते लक्षात आलं. थोडसं समजदारिन घेत त्यान पण उर्वशिला मोकलं केलं. आणि जाता जाता म्हणाला तिला ..आज लवकर सोडतोय पण उद्या मात्र भरपाई करणार हं ...
आणि मग उर्वशी पण एक खट्याळ कटाक्ष टाकत तिथून उठली अन् अंगावर्च्या कपड्यांची मुळीच पत्रास ना बाळगता तशीच यश च्या खोलीत शिरली. आणि मग परत एक वार त्या दोघांच्या प्रेमाला उधाण आलं.

पहाटेच्या सूर्य किरणां बरोबर म्हातारी जसप्रीत उठली . आन्हिकं आटोपून मोजुन चार पेले पाण्यान स्नान आटोपून देवासमोर पुजेला बसली . आणि मग अंगाला आळोखे पिळोखे देत अल्पवस्त्रा उर्वशी तिच्या मागोमाग न्हाणीत शिरली. अडीच तीन पेले पाणी पुरलं तिला ... यश आणि जगजीत अजुन झोपेतच होते......

म्हातारीला चाहुल लागताच ती बोलली .... अग उठलीस का? चल चहा मांड माझा पण दोघी घेऊ या घोट घोट भर
उर्वशिचं पोट आता बरच पुढे आलं होतं. नेमका कोणाचा प्रताप आहे ..कळायला काही मार्ग नव्हता, तसा ..पण बहुदा यशचाच पराक्रम असावा असं तिला वाटत होतं. सहावा महिना सुरु होता तिला .
काय म्हणतोय तुझा डॉक्टर?
सासु सुनेचं संभाषण सुरु झालं.
माँजी डाक्टर बोलला की मुलगीच आहे .
मग काय ठरवलय तू? म्हणजे?
माँजी किती आनंदाची गोष्ट आहे... ना .... आणि तपासणी केल्यावर बोलला की एकदम छान आहे बाळाची प्रकृति पण.
मी खरं तर मुलगा की मुलगी हे नव्हते विचारायला गेले ..
मी तर गर्भ कसा आहे हे बघायाला गेले होते. आणि त्यानी ही आनंद वार्ता स्वतःच सांगितली.

जसप्रीत ला आठवली २०१८ च्या ऑक्टोबर मधली ती संध्याकाळ. पाळी चुकली म्हणून सासु तिला घेउन डॉक्टर कड़े तपासायला आलेली. तपासण्या झाल्यात. एक सुई टाकुन पोटातुन पानी काढलं. परत दुसऱ्या दिवशी तिची सासु तिला घेउन दवाखान्यात आली . तिला काही एक ना विचारता निर्णय घेतल्या गेला. आणि तिचा गर्भपात करण्यात आला. एकांतात खुप रडली होती ती.

दोन वर्षानी मग जगजीत झाला आणि मग यश चं आगमन झालं. पण दरवेळी ती पूर्ण पणे अलिप्त असायची.

जसप्रीत न उर्वशिला जवळ बोलावलं. ये बेटा माझ्याजवळ बैस ना....
मी लावू का तुझ्या पोटाला हात?
उर्वशी तिच्या जवळ बसली. जसप्रीत ने तिला जवळ ओढली.
आणि अतीव ममतेने तिच्या पोटावरून , ओटीपोटावरून ती हात फिरवू लागली.

हळूच मग ती स्वतःचा कान तिच्या पोटाशी घेउन गेली.
लबाड बघ बोलते आहे माझ्याशी.
हळूच तिच्याकडे तोंड करून बोलायला लागली......
बेटी माफ़ कर गं मला...
मी किती पापीण ना ....
तुला आधीचं येऊ द्यायला हवं होतं गं मी.......
तिचे दोन अश्रु सांडलेत उर्वशी च्या पोटावर .....त्या ना आलेल्या बलिकेच्या
आठवणीत.....
आणि त्याच वेळी बाहेर पण अवेळीच आभाळ भरून आलेलं होतं...

सुनील जोशी
१६/११/२००९

Wednesday, November 11, 2009

मन राधेचे

श्यामल मेघांवरी त्या
सप्त रंगांची ऊधळण होते
मनी अचंभित राधा
निसर्ग नवलाते न्याहाळीते

फूलता विविध रंगी तो
मोरपिसारा त्या काननाते
इंद्रधनुष्यी मन राधेचे
झनक झनक थिरकते ....

किंचित चिंतित ती राधा
त्या सख्या हरिसी शोधिते
ना दिसता ती भय व्याकुळ
त्या कदंब डोही डोकाविते

थाम्बे तो मेघ ही वर्षता
अन् सूर्य ढगा आडुनी पाही ते
शामल कांति आकाशी दिसता
हर्षित राधा ती वेडावते

वेड्या त्या राधेसिं बघता
धुन मुरलीची उमटते
सुरेल धुन ती कानी पङता
गोकुळ हरिमय होई ते....

अन् मग .....

इंद्रधनुष्यी मन राधेचे
झनक झनक थिरकते ....

सुनील जोशी
१०/११/२००९

इथे मी स्वताला राधा स्थानी कल्पुन हां अनुभव घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे .प्रयत्न कृष्णार्पणमस्तु ..........

इन्द्र धनुष्यी मन माझे ........

सप्त रंगांची करीत ऊधळण
रथ रविराज जलदातुनी काढि
सुन्दर त्या मग प्रसन्न समयी
इन्द्र धनुष्यी मन माझे
झनक झनक थिरकत जाई ......

रंग मनाचे रंग धनुचे होती एकाकार
आपसुक अन् धुंद तनु ती घेई लयाकार
रंग सुरांचा सुरेख संगम असा असा होई
अन् मग इन्द्र धनुष्यी मन माझे
झनक झनक थिरकत जाई ......

प्रसन्न वारा, प्रसन्न समय तो
भरून उरे प्रसन्नता चहुकडे
आकाशातील इन्द्रधनुला सुर मुरलीचा अडे
अड़ता सुर मग इंद्रधनू ही गूढ़ आतुनी हसे
अन् मग इन्द्र धनुष्यी मन माझे
झनक झनक थिरकत जाई ......

सुनील जोशी
९/११/२००९

एक विनवणी

प्रणयातल्या त्या शपथा
आज तू आठवुनी जा
दिल्या घेतल्या वचनातें
आज तू निभवुनी जा

इष्कात धुंद मी अन्
इष्कात धुंद तू ही
उतरता धुंद आज ती
वायदे निभवुनी जा

प्रिये प्रियतमे सखे गं
गुंतलो असा मी
शोधुनी सापडे अता ना
वाट ती मुक्ततेची

विनवितो तुला गं
सखे आज वारंवार
अडकली आहे जी तुझ्यात
ती रात्र तू सोडवुनी जा
ती रात्र तू सोडवुनी जा............

सुनील जोशी
२/११/२००९

वसा आकाशाचा

लहानसा होतो ना तेव्हापासुनचं
तेव्हापासुनचं ना हे आकाश
मला मला खुप खुप भुरळ घालायचं

त्यात टीमटीमणारे ते तारे
त्या चांदण्या, तो शीतल चंद्र
आणि हजारो व्याट चा तो सूर्य

चंद्र आवडायचा ...............
मोठ्ठा असून पण कसा शांत
अगदी आई सारखा .. मायाळु

तो सूर्य मात्र सकाळ पासून
कसा लालेलाल ..तापलेला ..आग
अगदी बाबांसारखा... सदा तापलेला

पण आज कळताय ...
जगायला ह्या जगात
दोघे ही कसे जरुरीच ना....

तापलेला सूर्य बाबा
आणि शीतल चंद्र आई
दिवस अन् रात्री ....

सरून दिवस मग रात्र होते
तापल्यावर दिवसभर मगच
रात्री चंद्राची शीतलता मिळते

आता नाही आई ...
शांत शांत आई
शांत चित्ताने गेली
आकाशातल्या घरी

बाबा आहेत आता
ते आजही चालवतात
आकाशातला वसा

दिवसा तापलेल्या सुर्याचा
आणि हो रात्री चंद्राचा पण ....
आणि हो रात्री चंद्राचा पण ....

सुनील जोशी ३१/१०/२००९

Sunday, October 18, 2009

मोहे डर लागे

टेंशन टेंशन टेंशन..... ह्या टेंशनच्या भाराखाली मोडून पडेन की काय असं वाटायला लागलयं हल्ली . तिकडून म्यानेजमेंट ची तंबी, इकडून कामगार वर्गाचा असहकार करतोय गार .... प्रत्यक्ष बोलायला नाही येत समोर . शिखंडी सारखे वार सुरु असतात . आता अग्रीमेंट होवू घातलय म्हणे. त्या आधीची ही सगळी नाटकं .

काय व्ह्यायचं ते होवो ...पण आपलं रेगुलर लाइफ मात्र एकदम डिस्टर्ब झालय. घरात लक्ष देता येत नाहीय्ये , किती तरी वेळ सतत कामं सुरु आहेत पण फाइल चा ढिगारा संपायचे नावच नाही घेत. आताच स्टेनो ला चार पत्रं डिक्टेट केलीत. संध्याकाळचे सात वाजून गेलेले आहेत . ह्या स्टेनो ला मात्रं जायची घाई दिसत नाहीय्ये.

आजकाल अमिता ला संशय यायला लागलाय. मी ह्या स्टेनोत इन्वोल्व झालोय की काय म्हणून. तिला किती वेळा समजावून सांगितलं, अगदी त्या क्षणाच्या शपथा घेवून, मग थोडी कटकट , रडारड, आदळआपट , चिड चिड मग अबोला .... शेवटी समजावणी .... आणि मग .... वैताग येतो सगळ्याचा.

तशी ही स्टेनो आहे मात्र मस्तच. मोकळी चाकळी. आणि कामाला पण हुशार . दिसायला बरी आहे. पण राहणी मान मात्र एकदम आधुनिक . काय तिचे ते एक एक ड्रेस्सेस आणि काय तिचे ते हावभाव . विश्वमित्राला भुरळ घालणारी मेनका जणू .

मिस लीना घरी जायचे असेल ना तुम्हाला.
मी विचारलं ... तर फाटकन म्हणते कशी
काय घाई आहे सर .... आणि सर तुम्ही मला अहो जाहो का करता ? मला नाही बाई आवडत. अग पण लीना ...मी एकेरीवर येत बोललो ... हे ऑफिस म्यानर्स आहेत ..
ठीक ना सर ..चार चौघात ठीक आहेत ..पण आता तर मी एकटीच आहे ना इथे
म्हणजे? मी चमकून बघितलं.
तिच्या ओठावर तेच अवखळ हास्य आणि नजर मात्र पायाच्या अंगठ्याकड़े
तिला भरभर सूचना देवून परत पाठवली . नको नको ही नसती बिलामत नको . आधीच टेंशन काय कमी आहेत त्यात ही नवी भर नको . मी विचार करत बसलो .

क्यांव क्यांव टेबल वरचा इंटर कॉम केकाटला . त्रासिक नजरेने त्याच्या कड़े बघितले . दोन नंबर वरून फोन ...म्हणजे जी एम चा कॉल . अरे देवा . आता सात वाजायला आलेत . ह्यांनी आता बोलावलय म्हणजे .... दोन तासांची निश्चंती. वैताग नुसता. ह्याला काही घर दार आहे की नाही .... मनातल्या मनात शिव्या घालत फोन उचलला...

आणि मग फ़क्त चार शब्दांचं संभाषण ...
कम हियर ...येस् सर ....

निघायच्या वेळी आठवलं , आजच हिचे मामा मामी यायचे आहेत . त्यांना रिसीव करायला जायचं होत. पण आता काही खरं दिसत नाही. कमीत कमी तिला फोन करून सांगुन द्यावं.

परत लीना ला Instructions दिल्यात. घरी कळवुन दे. आणि पाहुण्यांना रिसीव करायला तूच जा म्हणून . आणि मग बसलो जावून मीटिंग ला .

नेहेमीप्रमाणे रेंगाळत रेंगाळत मीटिंग संपली . ह्या साहेबाला कुणी तरी मीटिंग कशी घ्यावी हें शिकवणे जरुरी आहे असे सगळ्या जणांना मनापासून वाटते. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?
घड्याळ बघितलं. साडे नऊ ...झालं ..आता घरी गेल्यावर काय वाढून ठेवलय.... देवा ..वाचव रे मला ह्यातून ...
मी लगेच निघणार ..तो लीना समोर हजर...

निघालात सर?
हो मग काय इथच बसु!
तसं नाही हो सर ...
पण काय गं तू अजुन इथेच कशी? गेली नाहीस?
सर तुम्ही कुठे म्हणालात मला की जा म्हणून? मग मी थांबले.
ठीक आहे ठीक आहे ...ह्यापुढे मी थांब असं सांगितल्या शिवाय थम्बत जावू नकोस...

सर मला लिफ्ट द्याल? प्लीज ....

हं चला ...आता इतका उशीर झालाय ..अजुन ...

मी पार्किंग मधून कार काढली . मागचं दार उघडायच्या आत ती पटकन समोरचं दार उघडून माझ्या बाजूला येवून पण बसली . अगदी सहज पणे.

मी कार सुरु केली. आणि लिनाच्या बडबडीला सुरुवात झाली. मला खरच खुप वैताग आला होता . पण आपलं स्त्री दाक्षिण्य आड़ येतं ना ... काही बोलता पण येई ना. मधेच एक कुत्रं आलं आडवं. आणि करकचून ब्रेक दाबावा लागला अगदी अनपेक्षित पणे. ही बया एकदम अंगावर येवून पडली . बरं पकन सावरावं की नाही तर तशीच रेंगाळली , अगदी आरामात पडून राहिली. अन् वर कमेन्ट पण

सर तुम्ही किनी भारीच खट्याळ बाई ....

आता ठरवून टाकलं ...हिला मूळीच लिफ्ट नाही द्यायची . तिला तिच्या खोली जवळ सोडले. म्हणते कशी

या की सर माझ्या रूम वर ...चहा घेऊ या ना ...

मनातल्या मनात अमिता ची मूर्ती डोळ्या समोर आली ...आणि मग घड्याळ दाखवत तिथून स्वताची सुटका करवून घेतली.

लिनाच्या स्वप्न रंजनात घरी कधी पोहोचलो ते कळले पण नाही. घरी पोहोचलो तो मामे सासरे समोर येत बोलले ...या जावई बापू ... खुपच बिझी बुवा तुम्ही . ऐकून होतो बरेच , पण आज प्रत्यक्ष अनुभव घेतला. वाटलं नव्हतं इतक्या लवकर साक्षात्कार होइल म्हणून.

अस्सा राग आला होता त्या कुजकट म्हातारयाचा.आणि त्यात सौ ची भुन भुन सुरूच होती . निदान आज तरी यायचं ना वेळेवर ... जनाची नाही तर मनाची तरी... पांघरलेल्या हसर्या चेहेर्याने ह्या संकटांना समोर गेलो .

सगळे साले बदमाश. जेव्हा त्या वन रूम किचन मधे होतो , अडचण असायची, एक जण नव्हता फिरकत कधी. आज सुबत्ता आली , वैभव आलयं , गाडी दिसते , बँगला दिसतोय ना ..मग बघा कसे गुळाला मुंगळे लागलेत.
कधी कधी वाटते तेच दिवस बरे होते. अड़चण होती पण हा त्रास नव्हता. येणार्या पाहुण्याचं काही नाही वाटत, पण त्यांच्या त्या कुजकट बोलण्यान जिव नकोसा होतो.

हो आता हाय सोसायटी मधे आहोत ना आम्ही. त्यामुले अपेक्षा पण वाढल्या आहेत आता सगळ्यान्च्या. ह्याच्या घरी दोन वेळेच्या जेवणाची असेल भ्रांत ...पण इकडे आलेत की जेवणा आधी सूप लागते त्याना ...आणि तेहि एक दिवस टोमाटो तर दुसरे दिवशी स्वीटकॉर्न .... जाऊ दे त्याबद्दल पण काही नाही म्हणायचं. पण कमीत कमी ते कुजकट बोलण .....

ते दिवस आठवतात . किती सुखी होतो आम्ही. भुत काळातल्या आठवणी झरझर डोळ्या समोरून जातात एखाद्या चित्रपटा प्रमाणे .

आमचं लग्न झालं ८६ साली. आधीचं एकमेकान्ना भेटण, प्रेम करण, आणि मग अगदी अरेंजेड म्यारेज ( ठरवून सफल प्रेम कहाणी) . लग्नात एकमेकांना चोरून बघणे, मग ते विवाहांनंतरचं समर्पण, नंतर एकमेकांच्या सहवासान एकमेकांच्या जीवनात विरघळुन जाण..... सगळ कसं अगदी कालच घडल्या सारखं वाटतय.

अजु़न ही आठवतो तो क्षण ...जेव्हा तिने मला सांगितलं होतं ते गुपित. आमच्या संसार वेलीवर फुलणार्या फुलाचं. मग त्याचं ते आगमन, त्या बाल लीला , नंतर त्याला खेल गाडी हावी म्हणून त्याच्या नंतर आलेली त्याची ती लहान बहिण, मग त्यांचं ते मोठं होत जाणे, त्या सगळ्या ना सोबत घेवून फिरायला जायचे ते दिवस...

पाखरांना पंख फुटले . ते त्यांच्या चार्याच्या शोधत निघून गेलेत. लहान घरात सगले कसे एकोप्याने होते. पण घर मोठे झाले आणि घरटयातुन पक्षी मात्र निघून गेलेत.

आता ते क्षण तर भूतकाळ झालेले आहेत. परत येणार नाहीत . राहतील टया फ़क्त आठवणी .
आताशा हे एक वेगळचं प्रलोभन मनाला ओढ़तय. कळतं सगळ पण मोह होतोच . कोणी म्हणून गेलय... येणार्या संधीचा फायदा घ्या. फार भीती वाटते.

संधीचा योग्य तो फायदा घेउन आज हे दिवस बघयला मिळालेत. पैसा . मान सन्मान , भौतिक सुखे ..सगळ सगळ मिळालयं . पण असं वाटते कधी कधी उद्या हे सगळ नाही राहिलं तर.... ह्या मोह जाळात गुर्फटून गेलो तर. ही रम्भा मला कुठे नेणार आहे कळत नाही .. मोहे डर लागे ... आणि त्या टेंशन नी रात्र रात्र झोप लागत नाही.


सुनील जोशी
१८/१०/२००९